उत्पत्ती 35

35
बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो
1मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा; आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध.”
2मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला.
3आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”
4तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानांत असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली; आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली.
5मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.
6ह्या प्रकारे याकोब आपल्याबरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज (म्हणजे बेथेल) येथे येऊन पोहचला.
7तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या ठिकाणास एल-बेथेल (बेथेलचा देव) हे नाव दिले; कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रकट झाला होता.
8रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.
9याकोब पदन-अरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
10देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे; पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्राएल होईल.” आणि देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.
11देव त्याला आणखी म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो; तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील.
12जो देश मी अब्राहाम व इसहाक ह्यांना दिला तो तुला देईन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीलाही तोच देश देईन.”
13मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले.
14आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्याला तैलाभ्यंग केला.
15जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या ठिकाणाचे नाव याकोबाने ‘बेथेल’ असे ठेवले.
राहेलीचा मृत्यू
16मग त्यांनी बेथेलहून कूच केले आणि एफ्राथ गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती.
17प्रसूतिवेदना होत असता सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे.”
18ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव ‘बेनओनी’ (माझ्या दु:खाचा पुत्र) ठेवले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव ‘बन्यामीन’ (माझ्या उजव्या हाताचा पुत्र) असे ठेवले.
19ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावाच्या वाटेवर तिला पुरले.
20मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे.
21नंतर इस्राएलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला.
22इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.
याकोबाचे मुलगे
(१ इति. 2:1-2)
23लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
24राहेलीचे मुलगे : योसेफ व बन्यामीन.
25राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे : दान व नफताली.
26आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे : गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले.
27मग किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रेस याकोब आपला पिता इसहाक ह्याच्याकडे गेला; तेथेच अब्राहाम व इसहाक हे पूर्वी वस्तीस होते.
इसहाकाचा मृत्यू
28इसहाकाचे वय एकशे ऐंशी वर्षांचे झाले.
29मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्‍या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली.

Marker

Del

Kopier

None

Vil du ha høydepunktene lagret på alle enhetene dine? Registrer deg eller logg på

Video om उत्पत्ती 35