उत्पत्ती 34

34
दीनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड
1याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दीना एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली.
2तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.
3याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले.
4मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “मला ही मुलगी बायको करून द्या.”
5त्याने आपली कन्या दीना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला.
6इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला.
7ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.
8हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की, “माझा मुलगा शखेम ह्याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे तर ती त्याला बायको करून द्या.
9तुम्ही आमच्याशी सोयरीक करा; तुमच्या मुली आम्हांला द्या व आमच्या मुली तुम्ही करा.
10आमच्यात वस्ती करून राहा; हा देश तुम्हांला खुला आहे; त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा.”
11शखेम दीनेच्या बापाला व भावांना म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन.
12वाटेल तो मोबदला व आंदण माझ्यापाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन; तेवढी मुलगी मला बायको करून द्या.”
13आपली बहीण दीना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर ह्याला उत्तर दिले.
14ते त्यांना म्हणाले, “बेसुनत माणसाला आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही, आम्हांला बट्टा लागेल.
15तुमच्या सर्व पुरुषांची सुंता करून तुम्ही आमच्यासारखे व्हावे ह्या अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू.
16असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हांला देऊ व तुमच्या मुली आम्ही करू, आणि आमची वस्ती तुमच्याबरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू.
17पण सुंता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ.”
18त्यांचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांना मान्य झाले.
19त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लावला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते; त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता.
20त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांनी आपल्या नगराच्या वेशीकडे जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लावले की,
21“ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत; तर ह्यांना देशात राहून व्यापारउदीम करू द्या, कारण पाहा, ह्यांना वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे; आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यांना देऊ.
22आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत, ती हीच की, त्यांची सुंता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी.
23हे केल्यास त्यांचे कळप, मालमत्ता आणि त्यांची सगळी जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करू या, म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील.”
24हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचे म्हणणे वेशीतून येणार्‍याजाणार्‍या सर्वांनी ऐकले; मग त्या नगराच्या वेशीतून येणार्‍याजाणार्‍या सर्व पुरुषांची सुंता झाली.
25तिसर्‍या दिवशी असे झाले की, ते बेजार असता याकोबाचे दोन मुलगे, म्हणजे दीनेचे भाऊ शिमोन व लेवी ह्यांनी आपापली तलवार हाती घेऊन त्या नगरावर अचानक छापा घातला आणि तेथील सर्व पुरुषांची कत्तल केली.
26हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचाही तलवारीने वध करून ते दीनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले.
27मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते.
28त्यांची शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले.
29त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुलेबाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले.
30तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”
31ते म्हणाले, “त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्येप्रमाणे व्यवहार करावा की काय?”

Marker

Del

Kopier

None

Vil du ha høydepunktene lagret på alle enhetene dine? Registrer deg eller logg på

Video om उत्पत्ती 34