रूथ 4:1-17
रूथ 4:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला. मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले. मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे, आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.” मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.” तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.” वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे. तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या. बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.” तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो. आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.” मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो. तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.” तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
रूथ 4:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला. नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले. तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेख याच्या मालकीची आहे. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,” तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.” यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.” (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.) म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!” तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस. या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाह यांचा पुत्र पेरेस यांच्यासारखे होवो.” तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला. तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: “याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो! तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे.” तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली. तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.
रूथ 4:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला. मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले. मग तो त्या जवळच्या आप्ताला म्हणाला, “मबाव देशाहून नामी आली आहे; ती आपला बांधव अलीमलेख ह्याच्या शेताचा वतनभाग विकत आहे; तर मला वाटते की, तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन ह्यांच्यासमक्ष ती जमीन तू खरेदी करावीस. तुला ती सोडवायची असली तर सोडव; ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल; कारण ती सोडवणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही; तुझ्यामागून माझा हक्क आहे.” तो म्हणाला, “मी ती सोडवतो.” बवाज म्हणाला, “ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल; ह्यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे.” तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, “मी ते वतन सोडवू शकत नाही; कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड होईल; तर माझा सोडवण्याचा हक्क तू घे, कारण मला ते सोडवता येत नाही.” वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्राएल लोकांत प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसर्यास देत असे; प्रमाण पटवण्याची इस्राएल लोकांत हीच चाल होती. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, “तूच ते वतन विकत घे.” मग त्याने आपले पायतण काढले. बवाज त्या वडील मंडळीला व सर्व लोकांना म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन ह्यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. ह्याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिला मोल देऊन घेत आहे; ते ह्यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदांतून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये; ह्याविषयी तुम्ही आज साक्षी आहात.” तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो; आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.” मग बवाजाने रूथशी लग्न केले. ती त्याची स्त्री झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणार्या जवळच्या आप्ताविरहित ठेवले नाही; त्याचे नाव इस्राएलात प्रख्यात होवो. हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो; कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.” मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली. “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय.