रूथ 4
4
बवाज रूथबरोबर विवाह करतो
1इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.
2मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले.
3मग तो त्या जवळच्या आप्ताला म्हणाला, “मबाव देशाहून नामी आली आहे; ती आपला बांधव अलीमलेख ह्याच्या शेताचा वतनभाग विकत आहे;
4तर मला वाटते की, तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन ह्यांच्यासमक्ष ती जमीन तू खरेदी करावीस. तुला ती सोडवायची असली तर सोडव; ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल; कारण ती सोडवणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही; तुझ्यामागून माझा हक्क आहे.” तो म्हणाला, “मी ती सोडवतो.”
5बवाज म्हणाला, “ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल; ह्यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे.”
6तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, “मी ते वतन सोडवू शकत नाही; कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड होईल; तर माझा सोडवण्याचा हक्क तू घे, कारण मला ते सोडवता येत नाही.”
7वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्राएल लोकांत प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसर्यास देत असे; प्रमाण पटवण्याची इस्राएल लोकांत हीच चाल होती.
8तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, “तूच ते वतन विकत घे.” मग त्याने आपले पायतण काढले.
9बवाज त्या वडील मंडळीला व सर्व लोकांना म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन ह्यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
10ह्याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिला मोल देऊन घेत आहे; ते ह्यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदांतून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये; ह्याविषयी तुम्ही आज साक्षी आहात.”
11तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो;
12आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.”
13मग बवाजाने रूथशी लग्न केले. ती त्याची स्त्री झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
14तेव्हा स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणार्या जवळच्या आप्ताविरहित ठेवले नाही; त्याचे नाव इस्राएलात प्रख्यात होवो.
15हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो; कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.”
16मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली.
17“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय.
18पेरेसाची वंशावळ ही : पेरेसाला हेस्रोन झाला,
19हेस्रोनाला राम झाला, रामाला अम्मीनादाब झाला,
20अम्मीनादाबाला नहशोन झाला, नहशोनाला सल्मोन झाला,
21सल्मोनाला बवाज झाला, बवाजाला ओबेद झाला,
22ओबेदाला इशाय झाला, आणि इशायाला दावीद झाला.
सध्या निवडलेले:
रूथ 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.