YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 1

1
शमुवेलाचा जन्म
1एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.
2त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते.
3हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत.
4एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे.
5हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती.
6तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती.
7शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे.
8तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”
9शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता.
10तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.
11ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.
12परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता.
13हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते; पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता; म्हणून एली ह्याला वाटले की, ती द्राक्षारस प्याली असावी.
14एली तिला म्हणाला, “तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्त हो.”
15हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते.
16मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका; मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते.”
17तेव्हा एली तिला म्हणाला, “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देवो.”
18ती म्हणाली, “ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी होवो.” मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले, व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.
19ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली.
20ह्या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला; “हा परमेश्वराकडे मागितला” असे म्हणून तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले.
21मग एलकाना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण करायला व नवस फेडायला आपल्या सगळ्या परिवारासह गेला.
22हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.”
23तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटेल तसे कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा; परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले.” तेव्हा ती स्त्री घरी राहिली, आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले.
24त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता.
25त्यांनी गोर्‍हा बळी दिला आणि त्या बालकास एलीकडे नेले.
26तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे.
27ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे.
28तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे.” तेव्हा एलकानाने तेथे परमेश्वराची आराधना केली.

सध्या निवडलेले:

१ शमुवेल 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन