रोमकरांस पत्र 1:21-32
रोमकरांस पत्र 1:21-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली. म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले. आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे, निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले. आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्यांना ते संमतीही देतात.
रोमकरांस पत्र 1:21-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या. याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली. परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन. या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच पुरुषही स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेने कामातुर होऊन, त्यांनी एकमेकांशी लज्जास्पद कर्मे केली, याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या अपराधांची योग्य शिक्षा मिळाली. यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले. ते निंदक, परमेश्वराचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ आणि बढाईखोर, नव्या वाईट मार्गाचा विचार करणारे, आणि आईवडिलांची आज्ञा न मानणारे झाले; ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले. अशा गोष्टी करणार्यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.
रोमकरांस पत्र 1:21-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असे की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्यांना संमतीही देतात.
रोमकरांस पत्र 1:21-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. असे की, त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या सत्याची लबाडीबरोबर अदलाबदल केली आणि ज्याचा युगानुयुगे गौरव केला जावा त्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची आराधना व सेवा केली. ह्या कारणामुळे देवाने त्यांना लज्जास्पद दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनीसुद्धा शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून पुरुषांनी पुरुषांबरोबर आपसात अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या अनीतीचे योग्य प्रतिफळ स्वतःवर ओढवून घेतले; कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते. ते निंदक, देवाचा तिटकारा करणारे, दुसऱ्यांचा अपमान करणारे, उद्धट, गर्विष्ठ, कुकर्मकल्पक, आईवडिलांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, निष्ठाहीन, ममताहीन व निर्दय असे झाले. जे ह्या रीतीने वागतात, ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना मान्यताही देतात.