YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 1

1
अभिनंदन
1पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :
2ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे.
3तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला,
4व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्‍चित ठरला.
5त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.
6त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात;
7त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो.
रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत
8पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
9तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा;
10ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो.
11तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे;
12म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.
13बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.
14हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे.
15ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्‍या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.
सुवार्तेचे स्वरूप
16कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.
17कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.
परराष्ट्रीयांची दुष्टाई
18वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
19कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.
20कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.
21देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.
22स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले;
23आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.
24ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असे की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी.
25त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन.
26ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.
27तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.
28आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
29सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.
30ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे,
31निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.
32जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्‍यांना संमतीही देतात.

सध्या निवडलेले:

रोमकरांस पत्र 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन