परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.
याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली. परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.
या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच पुरुषही स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेने कामातुर होऊन, त्यांनी एकमेकांशी लज्जास्पद कर्मे केली, याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या अपराधांची योग्य शिक्षा मिळाली.
यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले. ते निंदक, परमेश्वराचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ आणि बढाईखोर, नव्या वाईट मार्गाचा विचार करणारे, आणि आईवडिलांची आज्ञा न मानणारे झाले; ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले. अशा गोष्टी करणार्यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.