प्रकटी 22:3-10
प्रकटी 22:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही; त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील. आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू आहे, त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या दासांना कळवण्यासाठी आपला दूत पाठविला आहे.” “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.” ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.” नंतर देवदूत मला म्हणालाः “तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको; काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे.
प्रकटी 22:3-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल. तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.” “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.” नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे.
प्रकटी 22:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’ नंतर तो मला म्हणाला, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा2 देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. ‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे.
प्रकटी 22:3-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.” येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!” हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!” पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे.