YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 22:3-10

प्रकटी 22:3-10 MACLBSI

तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.” येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!” हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!” पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे.