स्तोत्रसंहिता 78:1-39
स्तोत्रसंहिता 78:1-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन. ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या. त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू. कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या. त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या. मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील. तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता. एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती, परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली. त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले. ते त्याची कृत्ये व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले. मिसर देशातल्या सोअन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या. त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले. तो त्यांना दिवसा मेघ व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे. त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले. त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले. तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. रानात परात्पराविरूद्ध बंड केले. नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले. ते देवाविरूद्ध बोलले, ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का? पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?” जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही. तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली, आणि आभाळाचे दरवाजे उघडले. खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला, आणि त्यांना आकाशातून धान्य दिले. देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले. त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला. त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला. ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले, त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले. मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले. पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते. त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले. इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही. म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले; त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले. जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले. देव आमचा खडक आहे, आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली. पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते. परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, आणि आपला सर्व राग भडकू देत नाही. ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.
स्तोत्रसंहिता 78:1-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्या वचनाकडे कान द्या. मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन; ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे, त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत. आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली. जेणेकरून येणार्या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते. सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी ऐन लढाईच्या दिवशी मागे फिरून पलायन केले. त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला. त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले. त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली. परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले. दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत. त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले. असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले. ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी स्वेच्छेने आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा घेतली. ते परमेश्वराच्या विरोधात बोलले; ते म्हणाले, “परमेश्वर खरोखर वाळवंटात मेज लावू शकतात का? खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?” जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले; त्यांचा अग्नी याकोबाविरुद्ध पेटला, आणि त्यांचा क्रोध इस्राएलावर भडकला. कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही; ते आपली सुटका करतील असा भरवसा ठेवला नाही. त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली; आणि आकाशाचे दरवाजे उघडले; लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला, त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले. मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली; त्यांना खाता येईल तेवढे सर्व अन्न त्यांनी दिले. त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला आणि त्यांच्या सामर्थ्याने दक्षिणेकडील वारा वाहू दिला. त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत, त्यांच्या तंबूच्या सभोवती खाली यावयास लावले. त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले— त्यांनी जे मागितले होते, ते सर्व त्यांना दिले. पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी, जेवण अद्यापही त्यांच्या मुखात असतानाच, परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला; त्यांच्या धष्टपुष्टांस ठार करून, इस्राएलच्या तरुणांना खाली पाडले. इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले; त्यांच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली. जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले. परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत आपली सुटका करणारे देवाधिदेव आहेत याची त्यांना आठवण झाली; परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत; त्यांच्या जिभेने ते त्यांच्याशी लबाड बोलत; त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती; त्यांच्याशी केलेल्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत. तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही. कारण ते केवळ वार्याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले.
स्तोत्रसंहिता 78:1-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन. ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की, त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे, आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात; आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये. एफ्राइमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरवली. त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते; आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले. मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली. त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले. दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे. त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले. त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले. तथापि ते त्याच्याविरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले, परात्पराविरुद्ध रुक्ष अरण्यात त्यांनी बंड केले. त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली. ते देवाविरुद्ध बोलले; ते म्हणाले, “रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय? पाहा, त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले, व त्याचे लोट चालले; तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरवील काय?” हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नी पेटला; इस्राएलावर त्याचा क्रोध भडकला. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेवला नाही. तरी त्याने वरती आभाळांस आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली. खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले. दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले. त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला. त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला; त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले. ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली. त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती, अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता, तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले, इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले, व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली. तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हांला मुक्त करणारा आहे, ह्याची आठवण त्यांना झाली. त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली. कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही. पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही. ते नश्वर आहेत, वार्याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत, ह्याची त्याने आठवण केली.