YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 78

78
एकनिष्ठपणे न वागणार्‍यावरही देवाची कृपा
आसाफाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा.
2मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.
3ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या,
4त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.
5त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की, त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे,
6आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्‍या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे.
7त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात;
8आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.
9एफ्राइमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरवली.
10त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते;
11आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले.
12मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली.
13त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.
14दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.
15त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले.
16त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले.
17तथापि ते त्याच्याविरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले, परात्पराविरुद्ध रुक्ष अरण्यात त्यांनी बंड केले.
18त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली.
19ते देवाविरुद्ध बोलले; ते म्हणाले, “रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय?
20पाहा, त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले, व त्याचे लोट चालले; तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरवील काय?”
21हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नी पेटला; इस्राएलावर त्याचा क्रोध भडकला.
22कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेवला नाही.
23तरी त्याने वरती आभाळांस आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली.
24खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले.
25दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले.
26त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला.
27त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला;
28त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले.
29ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली.
30त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती, अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता,
31तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले,
32इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले, व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
33ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली.
34तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले.
35देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हांला मुक्त करणारा आहे, ह्याची आठवण त्यांना झाली.
36त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली.
37कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही.
38पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.
39ते नश्वर आहेत, वार्‍याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत, ह्याची त्याने आठवण केली.
40कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!
41पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले.
42त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही; त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले,
43त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.
44त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले, म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना.
45त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले; त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले; त्याने बेडूक पाठवले, त्या बेडकांनी त्यांचे सर्वकाही नासून टाकले.
46त्याने त्यांच्या शेतातल्या उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले.
47त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश केला.
48त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या, व जनावरे विजांच्या हवाली केली.
49त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली.
50त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला; त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला.
51त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्‍यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;
52पण त्याने आपल्या लोकांना मेंढरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले.
53त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले.
54त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.
55त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.
56तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले, व त्याचे निर्बंध पाळले नाहीत,
57तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले; फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले.
58त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.
59हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला;
60त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;
61त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले.
62त्याने आपले लोक तलवारीच्या हवाली केले; आपल्या वतनावर तो रुष्ट झाला.
63अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.
64त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.
65तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्‍या वीरासारखा उठला.
66त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले; त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली.
67त्याने योसेफाचा डेरा वर्ज्य केला, एफ्राइमाचा वंश पसंत केला नाही;
68तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.
69उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70त्याने आपला सेवक दावीद ह्याला निवडले; त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले;
71आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले.
72आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 78: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन