YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 78:1-39

स्तोत्रसंहिता 78:1-39 MRCV

अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या. मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन; ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे, त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत. आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते. सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी ऐन लढाईच्या दिवशी मागे फिरून पलायन केले. त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला. त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले. त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली. परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले. दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत. त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले. असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले. ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी स्वेच्छेने आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा घेतली. ते परमेश्वराच्या विरोधात बोलले; ते म्हणाले, “परमेश्वर खरोखर वाळवंटात मेज लावू शकतात का? खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?” जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले; त्यांचा अग्नी याकोबाविरुद्ध पेटला, आणि त्यांचा क्रोध इस्राएलावर भडकला. कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही; ते आपली सुटका करतील असा भरवसा ठेवला नाही. त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली; आणि आकाशाचे दरवाजे उघडले; लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला, त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले. मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली; त्यांना खाता येईल तेवढे सर्व अन्न त्यांनी दिले. त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला आणि त्यांच्या सामर्थ्याने दक्षिणेकडील वारा वाहू दिला. त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत, त्यांच्या तंबूच्या सभोवती खाली यावयास लावले. त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले— त्यांनी जे मागितले होते, ते सर्व त्यांना दिले. पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी, जेवण अद्यापही त्यांच्या मुखात असतानाच, परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला; त्यांच्या धष्टपुष्टांस ठार करून, इस्राएलच्या तरुणांना खाली पाडले. इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले; त्यांच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली. जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले. परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत आपली सुटका करणारे देवाधिदेव आहेत याची त्यांना आठवण झाली; परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत; त्यांच्या जिभेने ते त्यांच्याशी लबाड बोलत; त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती; त्यांच्याशी केलेल्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत. तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही. कारण ते केवळ वार्‍याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले.