नीतिसूत्रे 26:1-16
नीतिसूत्रे 26:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही. जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे. मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील. मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल. जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो. पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे. मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे. एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे. जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो. आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो. आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते. विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
नीतिसूत्रे 26:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही. जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे! मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल. मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे. मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे. मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे. जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने. जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे. जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो. आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो. स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.
नीतिसूत्रे 26:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला बडगा. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल. जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते. लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते. मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्यासारखा आहे. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्या इसमाच्या हातात शिरणार्या काट्यासारखे आहे. कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करतो, आणि जो मूर्खाला कामाला लावतो तो कोणाही आल्यागेल्याला कामाला लावणार्यासारखा आहे. जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय. आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.” दरवाजा आपल्या बिजागर्यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणार्या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.