YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 26:1-16

नीतिसूत्रे 26:1-16 MRCV

ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही. जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे! मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल. मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे. मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे. मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे. जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने. जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्‍या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्‍या धनुर्धारीसारखा आहे. जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” दार त्याच्या बिजागर्‍यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो. आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो. स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.

नीतिसूत्रे 26 वाचा