नीतिसूत्रे 26
26
1उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.
2भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.
3घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला बडगा.
4मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील.
5मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल.
6जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते.
7लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते.
8मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्यासारखा आहे.
9मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्या इसमाच्या हातात शिरणार्या काट्यासारखे आहे.
10कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करतो, आणि जो मूर्खाला कामाला लावतो तो कोणाही आल्यागेल्याला कामाला लावणार्यासारखा आहे.
11जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय.
12आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे.
13आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.”
14दरवाजा आपल्या बिजागर्यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो.
15आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात.
16योग्य उत्तर देणार्या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.
17दुसर्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणार्या कुत्र्याचे कान धरून ओढणार्यासारखा होय.
18-19जो आपल्या शेजार्याला फसवतो आणि म्हणतो की, “मी थट्टा नव्हतो का करीत?” तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणार्या वेड्यासारखा आहे.
20सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो.
21निखार्याला जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण, तसा भांडण पेटवायला भांडखोर लागतो.
22कानी लागणार्याचे शब्द रुचकर पक्वान्नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात.
23वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय.
24द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो;
25तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत;
26त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल.
27जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.
28लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.