YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 22:1-16

नीतिसूत्रे 22:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते. कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो. मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही. श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे. जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल. जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो. निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील. ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो. परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो. आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.” व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील. जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा

नीतिसूत्रे 22:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे. दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात. लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात. टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील. जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल. याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात. आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!” वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात. बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल. श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा

नीतिसूत्रे 22:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे. सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल. ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो उन्मत्तपणा करणार्‍यास घालवून दे म्हणजे भांडण मिटेल, आणि कलह व अप्रतिष्ठा ही बंद पडतील. ज्याला मनाची शुद्धता आवडते, ज्याची वाणी कृपामय असते; अशाचा मित्र राजा असतो. परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत. पण विश्वासघातक्याचे शब्द तो व्यर्थ करतो. आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन.” परस्त्रियांचे मुख मोठा खाडा आहे; ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा