नीतिसूत्रे 22
22
1चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा
व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
2श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे;
त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.
3सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
4याहवेहचे भय ही नम्रता आहे;
त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
5दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात;
परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.
6लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
7जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो,
तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.
8जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल,
आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.
9उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात,
कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
10टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल;
भांडण आणि अपमान देखील बंद होतील.
11जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो
तो राजाचा मित्र होईल.
12याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात,
परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.
13आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे!
तो मला भर चौकात ठार करेल!”
14वेश्येचे मुख खोल खड्डा आहे;
ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
15बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,
परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
16श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो
आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.
ज्ञानाची तीस नीतिसूत्रे
प्रथम सूत्र
17लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव;
मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर,
18जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील
आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल.
19म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील,
मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा.
20सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी
मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?
21प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय
म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस
त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील?
दुसरे सूत्र
22गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका,
आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,
23कारण याहवेह त्यांचा खटला लढतील
आणि जीवनासाठी जीवन घेतील.
तिसरे सूत्र
24तापट माणसांची मैत्री करू नका,
जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,
25नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल,
आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.
चौथे सूत्र
26वचन देऊन हात मिळवणी करणार्यासारखे तुम्ही होऊ नका
किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
27जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर
ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.
पाचवे सूत्र
28ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत
त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.
सहावे सूत्र
29आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का?
ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही
तर राजांसमोर सेवा करतील.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 22: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.