चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे. दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात. लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात. टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील. जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल. याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात. आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!” वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात. बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल. श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.
नीतिसूत्रे 22 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 22:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ