नीतिसूत्रे 16:1-16
नीतिसूत्रे 16:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील. मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे. मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो. दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये. परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे. जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते. नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत. राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. राजाच्या मुखतेजात जीवन आहे, आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे. सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.
नीतिसूत्रे 16:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे. याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते. जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे. मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात. राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही. प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत. राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते. प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात. राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल. जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे. सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे!
नीतिसूत्रे 16:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. दैवी निर्णय राजाच्या ओठी असतात, न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही. खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत; पिशवीतील सर्व वजने त्याचीच आहेत. दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते. नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्यावर ते प्रेम करतात. राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो. राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे. ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.