YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 16:1-16

नीतिसूत्रे 16:1-16 MARVBSI

मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. दैवी निर्णय राजाच्या ओठी असतात, न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही. खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत; पिशवीतील सर्व वजने त्याचीच आहेत. दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते. नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्‍यावर ते प्रेम करतात. राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो. राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे. ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.