YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 11:1-15

नीतिसूत्रे 11:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते. सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते. सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल. नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्‍याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो, सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो. जो आपल्या शेजार्‍याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करतो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अध:पात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणार्‍यांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा

नीतिसूत्रे 11:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते. निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो. जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो. जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो. जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो. जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा

नीतिसूत्रे 11:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो. जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते. नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो. प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते. निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात. मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात. नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो. भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्‍याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो. नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो. विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्‍याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो. चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही. मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो. अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा