नीतिसूत्रे 11
11
1खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात,
परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.
2जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते,
परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
3नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो,
परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
4प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते,
परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.
5निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते,
परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात.
6नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते,
परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.
7मर्त्य मानवांच्या#11:7 मर्त्य मानवांच्या किंवा दुष्ट माणसांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते,
त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने#11:7 किंवा ज्यावर त्यांनी आशा ठेवली निष्फळ होतात.
8नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते,
आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो.
9भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो,
परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते.
10जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते;
जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो.
11नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते,
परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो.
12विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्याची निंदा करतो;
परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो.
13चहाडी करण्याने विश्वासघात होतो,
परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
14मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते,
परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो.
15अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते,
परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.
16दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते,
परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो.
17दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो,
परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात.
18दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते;
परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते.
19खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते,
परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो.
20याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात,
परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात.
21याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.
22विवेकहीन सुंदर स्त्री जणू
डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.
23नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो,
परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते.
24एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो,
दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो.
25उदार मनुष्याची समृद्ध होईल;
आणि जो दुसर्याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
26जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात,
परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात.
27जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते,
परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते.
28जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील,
परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.
29जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा#11:29 किंवा काहीच नाही मिळेल,
आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.
30नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय,
आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.
31जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते,
तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.