YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20:14-29

गणना 20:14-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत; म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले; पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत; तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.” पण अदोमाने उत्तर दिले, “माझ्या देशातून तू जायचे नाहीस; जाशील तर मी तलवार घेऊन तुझ्याशी सामना करायला येईन.” इस्राएल लोकांनी त्याला पुन्हा निरोप पाठवला की, “आम्ही राजमार्गानेच जाऊ आणि आम्ही किंवा आमची जनावरे तुझे पाणी प्यालो तर त्याची किंमत मी देईन; फक्त तुझ्या देशातून मला पायी जाऊ दे; दुसरे काही नको.” तरीपण तो म्हणाला, “तू जायचेच नाहीस.” मग अदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला. ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले. इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली. अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की, “अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले. अहरोन व त्याचा मुलगा एलाजार ह्यांना घेऊन होर डोंगरावर जा; आणि अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल; मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.” मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले. तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली; आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले. अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्‍या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.

सामायिक करा
गणना 20 वाचा

गणना 20:14-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच. खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले. पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत. कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू. परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु. इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही. पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला. अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले. इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले. होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांस ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले. आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा. अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले. इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.

सामायिक करा
गणना 20 वाचा