YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20

20
खडकातून पाणी
(निर्ग. 17:1-7)
1पहिल्या महिन्यात इस्राएल लोकांची सर्व मंडळी त्सीन रानात आली; त्यांनी कादेश येथे मुक्काम केला; तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली.
2तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले.
3ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते! 4तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून? 5मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.”
6तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले.
7परमेश्वर मोशेला म्हणाला,
8“आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.”
9परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली.
10मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले, आणि त्यांना मोशे म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे काय?”
11मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली.
12ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.”
13त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.
अदोम इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देत नाही
14नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत;
15म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले;
16पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत;
17तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.”
18पण अदोमाने उत्तर दिले, “माझ्या देशातून तू जायचे नाहीस; जाशील तर मी तलवार घेऊन तुझ्याशी सामना करायला येईन.”
19इस्राएल लोकांनी त्याला पुन्हा निरोप पाठवला की, “आम्ही राजमार्गानेच जाऊ आणि आम्ही किंवा आमची जनावरे तुझे पाणी प्यालो तर त्याची किंमत मी देईन; फक्त तुझ्या देशातून मला पायी जाऊ दे; दुसरे काही नको.”
20तरीपण तो म्हणाला, “तू जायचेच नाहीस.” मग अदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला.
21ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले.
होर डोंगरावर अहरोनाचा मृत्यू
22इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली.
23अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की,
24“अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.
25अहरोन व त्याचा मुलगा एलाजार ह्यांना घेऊन होर डोंगरावर जा;
26आणि अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल; मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.”
27मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले.
28तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली; आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले.
29अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्‍या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.

सध्या निवडलेले:

गणना 20: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन