गणना 19
19
अशुद्धता दूर करणे
1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला :
2“परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;
3ती एलाजार याजकाकडे द्यावी; त्याने तिला छावणीबाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्यासमोर वधावे;
4मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे;
5आणि त्याच्यादेखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे.
6तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे.
7नंतर याजकाने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी आणि छावणीत यावे; पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.
8त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुऊन अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
9मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी; ही राख इस्राएल मंडळीच्या पापहरणार्थ अशौचक्षालनाचे (अशुद्धी दूर करण्याचे) पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी.
10कालवडीची राख जमा करणार्याने आपले कपडे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; इस्राएल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय ह्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय.
11एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे;
12त्याने तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही.
13कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते.
14एखादा मनुष्य डेर्यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा : जो कोणी त्या डेर्यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.
15तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावीत.
16खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे.
17अशुद्ध झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झर्याचे पाणी ओतावे;
18आणि शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेर्यावर व तेथील सर्व पात्रे, माणसे ह्यांच्यावर शिंपडावे; तसेच ज्याने हाडाला, वधलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे;
19शुद्ध असलेल्या माणसाने अशुद्ध माणसावर तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी ते शिंपडावे; ह्याप्रमाणे सातव्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे; त्याने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल.
20जर अशुद्ध झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्रस्थान भ्रष्ट करणारा होय; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नाही म्हणून तो अशुद्ध होय.
21त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
22ज्या कशाला तो अशुद्ध मनुष्य स्पर्श करील ते अशुद्ध ठरेल, व जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”
सध्या निवडलेले:
गणना 19: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.