नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत; म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले; पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत; तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.” पण अदोमाने उत्तर दिले, “माझ्या देशातून तू जायचे नाहीस; जाशील तर मी तलवार घेऊन तुझ्याशी सामना करायला येईन.” इस्राएल लोकांनी त्याला पुन्हा निरोप पाठवला की, “आम्ही राजमार्गानेच जाऊ आणि आम्ही किंवा आमची जनावरे तुझे पाणी प्यालो तर त्याची किंमत मी देईन; फक्त तुझ्या देशातून मला पायी जाऊ दे; दुसरे काही नको.” तरीपण तो म्हणाला, “तू जायचेच नाहीस.” मग अदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला. ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले. इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली. अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की, “अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले. अहरोन व त्याचा मुलगा एलाजार ह्यांना घेऊन होर डोंगरावर जा; आणि अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल; मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.” मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले. तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली; आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले. अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.
गणना 20 वाचा
ऐका गणना 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 20:14-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ