गणना 13:28-33
गणना 13:28-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तेथे राहणारे लोक खूप शक्तीशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले. अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.” मोशेजवळच्या लोकांस गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.” पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.” आणि त्या मनुष्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तीशाली आपण नाहीत. ते म्हणाले, आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तीशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कोणत्याही मनुष्याचा सहज पराभव करण्याइतके शक्तीमान आहेत. आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.
गणना 13:28-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले. नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्यावर आणि यार्देन नदीच्या खोर्यात कनानी लोक राहतात.” तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.” परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.” आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत. तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”
गणना 13:28-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.” तेव्हा मोशेसमोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, “आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत.” पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.” त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली; ते म्हणाले, “जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे; तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”