YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 13

13
कनान देशाची पाहणी
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.”
3म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते.
4त्यांची नावे ही आहेत:
रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा;
5शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;
6यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब;
7इस्साखार गोत्रातील योसेफाचा पुत्र इगाल;
8एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा;
9बिन्यामीन गोत्रातील राफूचा पुत्र पालती;
10जबुलून गोत्रातील सोदीचा पुत्र गाद्दीयेल;
11मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी;
12दान गोत्रातील गमल्लीचा पुत्र अम्मीएल;
13आशेर गोत्रातील मिखाएलचा पुत्र सेथूर;
14नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी;
15गाद गोत्रातील माकीचा पुत्र गऊवेल.
16देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.)
17जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा. 18आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. 19ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत? 20तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)
21मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला. 22ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.) 23ते जेव्हा अष्कोल#13:23 अर्थात् घोस खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली. 24त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता. 25देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले.
हेरांचा अहवाल
26पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली. 27त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे. 28परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले. 29नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”
30तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.”
31परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.” 32आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत. 33तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”

सध्या निवडलेले:

गणना 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन