गणना 14
14
लोकांचा विद्रोह
1रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले. 2सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते! 3आम्ही तलवारीने पडावे म्हणूनच या देशात याहवेह आम्हाला आणत आहेत काय? आमच्या स्त्रिया आणि लेकरांना गुलाम म्हणून नेण्यात येईल. आम्ही इजिप्तकडे परत जावे हे आमच्यासाठी बरे नाही काय?” 4आणि ते एकमेकांना म्हणाले, “आपण एखाद्या पुढार्याची निवड करू आणि इजिप्त देशास परत जाऊ.”
5तेव्हा सर्व इस्राएली समुदाय जो तिथे एकत्र जमला होता, त्यांच्यासमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. 6नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली 7आणि सर्व इस्राएली समुदायाला म्हणाले, “आम्ही ज्या देशातून फिरून आलो तो देश अतिशय चांगला आहे. 8याहवेह जर आमच्याविषयी संतुष्ट असले तर त्या दूध व मध वाहत्या देशात ते आपल्याला घेऊन जातील आणि तो देश आम्हाला देतील. 9मात्र याहवेहविरुद्ध बंड करू नका. आणि तेथील लोकांचे भय बाळगू नका, कारण आम्ही त्यांना नष्ट करणार. त्यांचे संरक्षण नाहीसे झाले आहे, परंतु याहवेह आमच्याबरोबर आहेत. त्यांचे भय बाळगू नका.”
10परंतु सर्व समुदाय त्यांना धोंडमार करण्याविषयी बोलू लागले. तेव्हा सभामंडपावर सर्व इस्राएली लोकांना याहवेहचे तेज प्रकट झाले, 11याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील? 12मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.”
13मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. 14आणि ते त्या देशात राहणार्यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता. 15जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील, 16‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’
17“आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो: 18‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’ 19आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.”
20मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. 21परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे. 22ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली; 23त्यांच्यातील एकही व्यक्ती, जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले आहे त्यातील कोणीही तो देश पाहणार नाही. 24परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील. 25अमालेकी व कनानी लोक खोर्यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.”
26याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले: 27“कुठपर्यंत हा दुष्ट समुदाय माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? या कुरकुर करणाऱ्या इस्राएली लोकांच्या तक्रारी मी ऐकल्या आहे. 28म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन: 29याच रानात तुम्ही सर्व मरण पावाल—तुमच्यापैकी प्रत्येक जे वीस वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्यांची जनगणनेमध्ये गणती झाली आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली. 30ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही. 31ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा. 32परंतु तुमच्याविषयी तर असे की, तुमचे देह याच रानात पडतील. 33तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील. 34चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल. 35मी याहवेह हे बोललो आहे आणि जे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत त्या संपूर्ण दुष्ट समाजाला मी असे निश्चितच करेन. त्यांचा शेवट ते या रानातच पाहतील; ते येथेच मरण पावतील.”
36म्हणून मोशेने ज्या पुरुषांना देश हेरण्यास पाठवले होते, ज्यांनी माघारी येऊन त्या देशाविषयी वाईट अहवाल पसरविला होता, संपूर्ण समाजाला मोशेविरुद्ध कुरकुर करण्यास भाग पाडले होते— 37हे पुरुष जे त्या देशाबद्दल वाईट अहवाल पसरविण्यास जबाबदार होते, त्यांच्यावर पीडा आली व ते याहवेहसमोर मरण पावले. 38देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी फक्त नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब हे वाचले.
39जेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, त्यांनी मोठा शोक केला. 40दुसर्या दिवशी पहाटेच ते डोंगराळ प्रदेशाकडे डोंगराच्या शिखराकडे असे म्हणत निघाले, “याहवेहने वचन दिलेल्या देशाकडे वर जाण्यास आम्ही तयार आहोत. खरोखरच आम्ही पाप केले आहे!”
41परंतु मोशे म्हणाला, “तुम्ही याहवेहचा आज्ञाभंग का करता? यात तुम्हाला यश मिळणार नाही! 42वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल, 43कारण अमालेकी व कनानी लोक तिथे तुम्हाला सामोरे येतील. कारण तुम्ही याहवेहपासून मागे फिरला आहात, ते तुमच्याबरोबर नाहीत आणि तुम्ही तलवारीने मरून पडाल.”
44जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत. 45मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले.
सध्या निवडलेले:
गणना 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.