YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 8:3-10

नहेम्या 8:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले. एज्रा शास्त्री एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते. आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले. एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले. बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया, या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले. यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांस स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांस बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दु:खी राहू नका किंवा शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते. नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.”

सामायिक करा
नहेम्या 8 वाचा

नहेम्या 8:3-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले. त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते. एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली. ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते. मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते. नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.”

सामायिक करा
नहेम्या 8 वाचा

नहेम्या 8:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया व मासेया हे उभे राहिले; व त्याच्या डावीकडे पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखर्‍या व मशुल्लाम हे उभे राहिले. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता; त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले. मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”

सामायिक करा
नहेम्या 8 वाचा