YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 8:3-10

नहेम्या 8:3-10 MRCV

सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले. त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते. एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली. ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते. मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते. नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.”

नहेम्या 8 वाचा