त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला.
लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया व मासेया हे उभे राहिले; व त्याच्या डावीकडे पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखर्या व मशुल्लाम हे उभे राहिले.
एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता; त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले.
मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला.
येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.
त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.
मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते.
तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”