YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 8:1-30

मार्क 8:1-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.” त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले. आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला. मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले. आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला. तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.” मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?” ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.” “आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हास समजत नाही काय?” ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?” त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.” नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले. मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?” त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.” येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”

सामायिक करा
मार्क 8 वाचा

मार्क 8:1-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावले व ते म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.” शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कोणी आणावे?” येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले. त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. सर्व समुदाय जेवला व तृप्त झाला. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. तेथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले. तेथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले. हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कसलेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर ते त्यांना सोडून निघून गेले, व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले. शिष्य आपल्याबरोबर भाकरी आणावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती. “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.” ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील. परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का? तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “बारा” त्यांनी उत्तर दिले. “आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “सात,” त्यांनी उत्तर दिले. येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?” ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?” तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.” तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी त्याला अशी ताकीद देऊन त्याच्या घरी पाठविले. येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या खेड्यात गेले, वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “काही लोक म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीया; आणि आणखी काही कोणीतरी संदेष्टा आहात असे म्हणतात.” “परंतु तुमचे मत काय आहे?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.” “ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले.

सामायिक करा
मार्क 8 वाचा

मार्क 8:1-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या सात भाकरी घेतल्या व उपकारस्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला. मग परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?” मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व ‘आपण त्याला स्पर्श करावा’ अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले; तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस.” नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जाण्यास निघाले; तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली.

सामायिक करा
मार्क 8 वाचा

मार्क 8:1-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या व आभार मानून त्या मोडल्या व वाढण्याकरता त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. त्यांनी लोकांना त्या वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला. एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले. अंतर्यामी व्यथित होऊन तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, ह्या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे जायला निघाला. शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.” तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले. हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते म्हणाले, “सात.” तेव्हा त्याने विचारले, “अजून तुम्हांला समजत नाही काय?” येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली. त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी लावून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”, त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. त्या माणसाने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले. त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.” येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली.

सामायिक करा
मार्क 8 वाचा