त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावले व ते म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.”
शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कोणी आणावे?”
येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले. त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. सर्व समुदाय जेवला व तृप्त झाला. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. तेथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.
तेथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले. हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कसलेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर ते त्यांना सोडून निघून गेले, व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.
शिष्य आपल्याबरोबर भाकरी आणावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती. “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”
ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील.
परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का? तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?”
“बारा” त्यांनी उत्तर दिले.
“आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?”
“सात,” त्यांनी उत्तर दिले.
येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?”
ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?”
तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.”
तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी त्याला अशी ताकीद देऊन त्याच्या घरी पाठविले.
येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या खेड्यात गेले, वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?”
त्यांनी उत्तर दिले, “काही लोक म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीया; आणि आणखी काही कोणीतरी संदेष्टा आहात असे म्हणतात.”
“परंतु तुमचे मत काय आहे?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”
“ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले.