YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 8

8
चार हजारांना भोजन खाऊ घालणे
1त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावले व ते म्हणाले, 2“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. 3मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.”
4शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कोणी आणावे?”
5येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
6त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले. 7त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले. 8सर्व समुदाय जेवला व तृप्त झाला. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. 9तेथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर, 10येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.
11तेथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले. 12हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कसलेही चिन्ह दिले जाणार नाही.” 13नंतर ते त्यांना सोडून निघून गेले, व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.
परूशी आणि हेरोद यांचे खमीर
14शिष्य आपल्याबरोबर भाकरी आणावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती. 15“सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”
16ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील.
17परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का? 18तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? 19पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?”
“बारा” त्यांनी उत्तर दिले.
20“आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?”
“सात,” त्यांनी उत्तर दिले.
21येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?”
बेथसैदा येथील एका आंधळ्या मनुष्याला दृष्टी देणे
22ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. 23येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?”
24तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.”
25तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. 26“या गावात जाऊ नकोस,” येशूंनी त्याला अशी ताकीद देऊन त्याच्या घरी पाठविले.
येशू हे ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
27येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या खेड्यात गेले, वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?”
28त्यांनी उत्तर दिले, “काही लोक म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीया; आणि आणखी काही कोणीतरी संदेष्टा आहात असे म्हणतात.”
29“परंतु तुमचे मत काय आहे?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”
30“ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले.
येशू आपल्या मृत्यूचे भविष्य करतात
31यानंतर येशू त्यांना शिकवू लागले मानवपुत्राला पुष्कळ दुःख सहन करण्याचे अगत्य आहे. त्याचप्रमाणे यहूदी पुढारी, वडीलजन, प्रमुख याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी पुनः उठावे हे आवश्यकच आहे. 32ते या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले आणि पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला.
33येशूंनी वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि मग पेत्राला ते धमकावून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टीआड हो. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”
क्रूसाचा मार्ग
34नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलावले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. 35कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तर तो त्याचा जीव वाचवेल. 36कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? 37आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? 38ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या समवेत गौरवाने परत येईन तेव्हा लाज वाटेल.”

सध्या निवडलेले:

मार्क 8: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन