YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:38-44

मार्क 12:38-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:38-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.” येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती. ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दान पात्रात टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरीबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:38-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपून राहा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारांत नमस्कार घेणे, आणि सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य बैठका ह्यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.” मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:38-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पुढे तो आपल्या प्रबोधनात त्यांना म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा, त्यांना पायघोळ झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानांत राखीव आसने व मेजवानीत मानाच्या जागा मिळवायची आवड असते. ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.” एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली. त्याने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावून म्हटले, “मी तुम्हांला सत्य सांगतो, हे जे दान टाकत आहेत, त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने, तिच्याकडे उपजीविकेसाठी जे होते, ते सर्व टाकले.”

सामायिक करा
मार्क 12 वाचा