YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12

12
द्राक्षमळ्याचा दाखला
1येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला, “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्षारसासाठी कुंड खणले. पहाऱ्यासाठी माळा बांधला आणि द्राक्षमळा कुळांकडे सोपवून तो परदेशात निघून गेला. 2पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला कुळांकडून द्राक्षमळ्याच्या फळांतून आपला वाटा मिळावा म्हणून त्याने एका नोकराला कुळांकडे पाठवले. 3त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले. 4पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्याच्या डोक्यावर इजा करून त्याचा अपमान केला. 5त्याने आणखी एकाला पाठवले. त्याला तर त्यांनी ठार मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यांतून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांना ठार मारले. 6अजून त्याच्याजवळ एक जण उरला होता. तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाचा तरी ते मान राखतील, म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. 7परंतु ती कुळे आपसात म्हणाली, ‘हा तर वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ 8त्यांनी त्याला धरून ठार मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.
9तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या कुळांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. 10तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’ 11हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे !”
12तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला, हे त्यांच्या ध्यानात आले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली म्हणून ते येशूला सोडून निघून गेले.
कैसरला कर देण्याविषयी प्रश्‍न
13त्यांनी येशूला बोलण्यात पकडण्याकरता काही परुश्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवले. 14ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आपण खरे असून कोणाची भीड बाळगत नाही. आपण व्यक्तीनुसार नव्हे तर सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही? आम्ही तो भरावा की भरू नये?”
15त्यांचा डाव ओळखून तो त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या. मला ते पाहू द्या.”
16त्यांनी ते आणले, त्याने त्यांना विचारले, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.”
17येशू त्यांना म्हणाला, “कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” हे उत्तर ऐकून त्यांना त्याच्याविषयी अत्यंत आश्‍चर्य वाटले.
पुनरुत्थानाविषयी
18पुनरुत्थान नाही, असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले व त्याला विचारू लागले, 19“गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी अशी आज्ञा लिहून ठेवली आहे की, कोणा एकाचा भाऊ निधन पावला आणि त्याची पत्नी मागे राहिली व त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने तिच्याबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. 20कोणी सात भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने पत्नी केली व तो संतती न होता निधन पावला. 21मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली. 22ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता निधन पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. 23तर मग पुनरुत्थानसमयी ते सर्व उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.”
24येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. 25मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. 26तरी पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात, ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे’? 27तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”
सर्वांत पहिली आज्ञा
28त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”
29येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे. 30तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ 31दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”
32तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. 33तसेच संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ ह्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.”
34त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून येशूला आणखी काही विचारण्याचे धाडस कुणाला झाले नाही.
ख्रिस्त दावीदचा पुत्र व प्रभू
35मंदिरात शिकवत असता येशूने प्रश्न विचारला, “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे? 36कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले,
परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
‘मी तुझ्या शत्रूंना
तुझ्या पायांखाली घालीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’
37दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” आणि जनसमुदाय हे आनंदाने ऐकत होता.
शास्त्र्यांसंबंधाने इशारा
38पुढे तो आपल्या प्रबोधनात त्यांना म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा, त्यांना पायघोळ झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे 39आणि सभास्थानांत राखीव आसने व मेजवानीत मानाच्या जागा मिळवायची आवड असते. 40ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.”
विधवेने केलेले दान
41एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. 42एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली. 43त्याने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावून म्हटले, “मी तुम्हांला सत्य सांगतो, हे जे दान टाकत आहेत, त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. 44कारण त्या सर्वांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने, तिच्याकडे उपजीविकेसाठी जे होते, ते सर्व टाकले.”

सध्या निवडलेले:

मार्क 12: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन