YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:38-44

मार्क 12:38-44 IRVMAR

शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”