मत्तय 25:1-30
मत्तय 25:1-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही. कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली. त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली. त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला; मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत. मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल. नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.
मत्तय 25:1-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल, त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले. वराला येण्यास उशीर लागला म्हणून त्या सर्वांना डुलक्या लागल्या, व झोपी गेल्या. “मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली. “मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ “ ‘नाही’ त्यांनी उत्तर दिले, ‘ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्यांकडे जा आणि स्वतःसाठी ते विकत आणा.’ “त्या तेल विकत आणावयास गेल्या असताना वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला. “काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व ‘प्रभू, प्रभू,’ असे म्हणू लागल्या, ‘आम्हासाठी दार उघडा!’ “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही.’ “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही. “अजून ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलावले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली. त्याने एकाला पाच तालांत, दुसर्याला दोन आणि तिसर्याला एक असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला. नंतर, ज्या सेवकाला पाच मिळाले होते, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच शिक्के अधिक मिळविले. त्याचप्रमाणे ज्याला दोन मिळाले होते, त्यानेही आणखी दोन शिक्के मिळविले. पण ज्याला एक शिक्का मिळाला, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहवा म्हणून त्याच्या मालकाचा शिक्का दडवून ठेवला. “बर्याच काळानंतर त्यांचा धनी परत आला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलावले. ज्याला पाच मिळाले होते त्याने धन्याला दहा आणून दिले. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच दिले होते; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविले आहेत.’ “शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “यानंतर ज्याला दोन दिले होते तो सेवक सुद्धा पुढे आला; ‘महाराज,’ तो म्हणाला, ‘तुम्ही मला दोन दिले होते, ते मी दुप्पट केले आहेत.’ “शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “नंतर जो सेवक ज्याला एक शिक्का दिला होता, घेऊन पुढे आला. ‘महाराज,’ तो म्हणाला, ‘तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जेथे तुम्ही पेरले नाही तेथून कापणी करता आणि जेथे तुम्ही विखुरले नाही तेथून गोळा करता. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेला एक शिक्का भूमीत दडवून ठेवला. पाहा, तो आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणला आहे.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथून मी कापणी करतो आणि जेथे मी विखुरले नाही तेथून गोळा करतो तुला एवढे तुला माहीत होते. तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासकट मिळाले असते. “ ‘मग धन्याने आज्ञा दिली, या माणसाकडून ते घ्या आणि ज्याच्याजवळ दहा आहेत त्याला द्या. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांना नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’
मत्तय 25:1-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाण्यास निघाल्या. त्यांत पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’ मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही; तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे.’ त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल; आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
मत्तय 25:1-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल. त्या त्यांचे दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यांत पाच मूर्ख व पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी त्यांचे दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. वराला विलंब लागला व सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’ त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ शहाण्यांनी उत्तर दिले, “नाही. आम्हांला व तुम्हांला पुरेल एवढे तेल आमच्याकडे नाही. तुम्ही स्वतःकरता तेल विकत घेऊन या.’ त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’ त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना? तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’