YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:1-30

मत्तय 25:1-30 MRCV

“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल, त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले. वराला येण्यास उशीर लागला म्हणून त्या सर्वांना डुलक्या लागल्या, व झोपी गेल्या. “मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली. “मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’  “ ‘नाही’ त्यांनी उत्तर दिले, ‘ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्‍यांकडे जा आणि स्वतःसाठी ते विकत आणा.’ “त्या तेल विकत आणावयास गेल्या असताना वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला. “काही वेळाने त्या दुसर्‍याही कुमारी आल्या व ‘प्रभू, प्रभू,’ असे म्हणू लागल्या, ‘आम्हासाठी दार उघडा!’ “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही.’ “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही. “अजून ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलावले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली. त्याने एकाला पाच तालांत, दुसर्‍याला दोन आणि तिसर्‍याला एक असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला. नंतर, ज्या सेवकाला पाच मिळाले होते, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच शिक्के अधिक मिळविले. त्याचप्रमाणे ज्याला दोन मिळाले होते, त्यानेही आणखी दोन शिक्के मिळविले. पण ज्याला एक शिक्का मिळाला, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहवा म्हणून त्याच्या मालकाचा शिक्का दडवून ठेवला. “बर्‍याच काळानंतर त्यांचा धनी परत आला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलावले. ज्याला पाच मिळाले होते त्याने धन्याला दहा आणून दिले. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच दिले होते; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविले आहेत.’ “शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “यानंतर ज्याला दोन दिले होते तो सेवक सुद्धा पुढे आला; ‘महाराज,’ तो म्हणाला, ‘तुम्ही मला दोन दिले होते, ते मी दुप्पट केले आहेत.’ “शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “नंतर जो सेवक ज्याला एक शिक्का दिला होता, घेऊन पुढे आला. ‘महाराज,’ तो म्हणाला, ‘तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जेथे तुम्ही पेरले नाही तेथून कापणी करता आणि जेथे तुम्ही विखुरले नाही तेथून गोळा करता. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेला एक शिक्का भूमीत दडवून ठेवला. पाहा, तो आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणला आहे.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथून मी कापणी करतो आणि जेथे मी विखुरले नाही तेथून गोळा करतो तुला एवढे तुला माहीत होते. तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासकट मिळाले असते. “ ‘मग धन्याने आज्ञा दिली, या माणसाकडून ते घ्या आणि ज्याच्याजवळ दहा आहेत त्याला द्या. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांना नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

मत्तय 25 वाचा