मत्तय 22:15-33
मत्तय 22:15-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही. म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले. पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. शेवटी ती स्त्री मरण पावली. आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.
मत्तय 22:15-33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली. त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही. तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळयात पाडू पाहता काय? कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले. त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे, सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. पण हीच गोष्ट दुसर्या व तिसर्या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली. सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली. जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता. पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय? ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा परमेश्वर आहे,’ म्हणजेच परमेश्वर मृतांचा नसून जिवंताचा आहे.” सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.
मत्तय 22:15-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.” हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ आमच्यामध्ये सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले.
मत्तय 22:15-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली. त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते, हे आम्हांला सांगा. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही?” येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता? कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून निघून गेले. पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले, “गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले आणि सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय? ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.” हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला.