मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही. म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. शेवटी ती स्त्री मरण पावली. आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.”
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.