YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:15-33

मत्तय 22:15-33 MARVBSI

नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.” हे ऐकून ते थक्‍क झाले व त्याला सोडून गेले. पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्‍या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ आमच्यामध्ये सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्‍चर्य वाटले.