लूक 8:22-56
लूक 8:22-56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला; मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.” कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने म्हटले, “सैन्य”; कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’ तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले. तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?” पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.” ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
लूक 8:22-56 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात. मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले. आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. आणि येशूने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले. मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला. आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, “तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला. नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली. कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.” तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.
लूक 8:22-56 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले. ते जात असताना येशू होडीत झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कुठे आहे?” भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटांनाही आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात आले. येशू होडीतून किनार्यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्याच काळापर्यंत हा मनुष्य बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.” कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्याच्यामधून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळ्यांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळ्या तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे. येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” “माझे नाव लेगियोन आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते. ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अथांग कूपात जाण्याची आज्ञा करू नका.” जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो संपूर्ण कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला. डुकरांचे कळप राखणार्यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तिथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडील प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारी जाण्यास निघाले. ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, “आपल्या घरी परत जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे काही केले आहे ते त्यांना सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले. जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली. कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले. आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. तिने येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला. तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?” जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.” परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले. येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.” येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.” हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.” याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही. ते घर शोक करणार्या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.” तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”
लूक 8:22-56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला; मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.” कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने म्हटले, “सैन्य”; कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’ तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले. तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?” पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.” ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
लूक 8:22-56 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला, ते मचवा हाकारून पुढे जात असता येशू झोपी गेला. सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले त्यामुळे ते धोक्यात होते. ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरुवर्य, गुरुवर्य, आम्ही बुडत आहोत” तेव्हा त्याने उठून वारा व उसळलेल्या लाटा ह्यांना शांत होण्याचा हुकूम सोडला. त्यावेळी वारा व उसळलेल्या लाटा शांत होऊन सर्व निवांत झाले. त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत व विस्मित होऊन एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारा व लाटा ह्यांनादेखील हा हुकूम सोडतो व ते त्याचे ऐकतात.” येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुतांनी पछाडले होते. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो दफन भूमीत राहत असे. येशूला पाहून तो ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो मला छळू नकोस.” कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “सैन्य”, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.” तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरावर चरत होता, “त्यात आम्हांला जाऊ दे”, अशी त्यांनी त्याला विनंती केली. त्याने त्यांना जाऊ दिले. भुते त्या माणसातून निघून डुकरांत शिरली आणि तो कळप सुसाट वेगाने धावत पळत कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले. जे झाले ते पाहायला लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती, तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा त्यांना आढळला. त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी येशूला तेथून निघून जाण्याची विनंती केली कारण ते फार घाबरले होते. तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला. नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. तेथे बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या किनारीला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.” येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले आहे.” आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.” तो बोलत आहे इतक्यात अधिकाऱ्याच्या घरून निरोप घेऊन आलेला माणूस याईरला म्हणाला, “तुमची मुलगी निधन पावली आहे, आता गुरुजींना तसदी देऊ नका.” ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती निधन पावली नाही, झोपेत आहे.” तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. त्याने तिच्या हाताला धरून मोठ्याने म्हटले, “मुली, ऊठ!” तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले. तिचे आईवडील आश्चर्यचकित झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.