आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले. आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. आणि येशूने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले. मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला. आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, “तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला.
नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली.
कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”
तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.