YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 8:22-39

लूक 8:22-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला; मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्‍यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.” कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्‍यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने म्हटले, “सैन्य”; कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’ तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले. तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला.

सामायिक करा
लूक 8 वाचा

लूक 8:22-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात. मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले. आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. आणि येशूने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले. मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला. आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, “तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला.

सामायिक करा
लूक 8 वाचा

लूक 8:22-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ,” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले, ते जात असताना येशू झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटा यांना देखील आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात आले. येशू होडीतून किनार्‍यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्‍याच काळापर्यंत हा माणूस बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.” कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्यातून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळयांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळया तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे. येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” “माझे नाव सैन्य आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते. ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नका.” जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो सर्व कळपच्या कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला. डुकरांचे कळप राखणार्‍यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तेथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूताने पछाडलेल्या माणसाचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारे जाण्यास निघाले. ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, “परत घरी जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली आहे ते सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले.

सामायिक करा
लूक 8 वाचा

लूक 8:22-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एकदा तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला, ते मचवा हाकारून पुढे जात असता येशू झोपी गेला. सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले त्यामुळे ते धोक्यात होते. ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरुवर्य, गुरुवर्य, आम्ही बुडत आहोत” तेव्हा त्याने उठून वारा व उसळलेल्या लाटा ह्यांना शांत होण्याचा हुकूम सोडला. त्यावेळी वारा व उसळलेल्या लाटा शांत होऊन सर्व निवांत झाले. त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत व विस्मित होऊन एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारा व लाटा ह्यांनादेखील हा हुकूम सोडतो व ते त्याचे ऐकतात.” येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुतांनी पछाडले होते. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो दफन भूमीत राहत असे. येशूला पाहून तो ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो मला छळू नकोस.” कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “सैन्य”, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.” तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरावर चरत होता, “त्यात आम्हांला जाऊ दे”, अशी त्यांनी त्याला विनंती केली. त्याने त्यांना जाऊ दिले. भुते त्या माणसातून निघून डुकरांत शिरली आणि तो कळप सुसाट वेगाने धावत पळत कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले. जे झाले ते पाहायला लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती, तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा त्यांना आढळला. त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी येशूला तेथून निघून जाण्याची विनंती केली कारण ते फार घाबरले होते. तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला.

सामायिक करा
लूक 8 वाचा