एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ,” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले, ते जात असताना येशू झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले.
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.”
ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कोठे आहे?”
भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटा यांना देखील आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”
मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात आले. येशू होडीतून किनार्यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्याच काळापर्यंत हा माणूस बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.” कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्यातून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळयांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळया तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे.
येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”
“माझे नाव सैन्य आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते. ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नका.”
जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो सर्व कळपच्या कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला.
डुकरांचे कळप राखणार्यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तेथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूताने पछाडलेल्या माणसाचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारे जाण्यास निघाले.
ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, “परत घरी जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली आहे ते सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले.