लूक 21:25-33
लूक 21:25-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील. नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील. परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.” नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा. त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
लूक 21:25-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील. भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ डळमळेल. त्यावेळी ते मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशात मेघारूढ होऊन सामर्थ्याने व पराक्रमाने परत येत असलेले पाहाल. या सर्वगोष्टी घडण्यास प्रारंभ होईल, तेव्हा उभे राहा आणि वर नजर लावा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ आली आहे असे समजा.” नंतर येशूंनी लोकांना हा दाखला सांगितला: “अंजिराच्या झाडाकडे आणि सर्व झाडांकडे पाहा. जेव्हा पालवी फुटू लागते तेव्हा तुम्ही स्वतःच पाहू शकता आणि ओळखता की उन्हाळा जवळ आला आहे. तसेच मी सांगितलेल्या गोष्टी घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा परमेश्वराचे राज्य जवळ आहे हे समजून घ्या. “मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
लूक 21:25-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील; भयाने व जगावर कोसळणार्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; कारण ‘आकाशातील बळे डळमळतील.’ आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.” त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पाहा; त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील; परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत.
लूक 21:25-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या समयी सूर्य, चंद्र व तारे ह्यांत विलक्षण गोष्टी घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे गोंधळून जाऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील शक्तिस्थाने डळमळतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने मेघांत येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या घटनांचा आरंभ होऊ लागेल, तेव्हा न डगमगता उभे राहा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आलेला असेल.” नंतर येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे ह्यांच्याकडे पहा. त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या घडामोडी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी निश्चितपणे सांगतो, ही पिढी नष्ट होण्यापूर्वी ह्या सर्व घटना घडतील. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत.