YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 21:25-33

लूक 21:25-33 IRVMAR

सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील. नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील. परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.” नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा. त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.